
कोरोना लॉकडाऊनच्या काळात पश्चिम रेल्वेने माहीम यार्ड रिमॉडेलिंगचे तांत्रिक काम पार पाडल्याने हार्बरच्या लोकलचा वेग वाढणार आहे. या ठिकाणची रुळांची तीव्र वळणे कमी करून क्रॉस ओव्हर हटविल्याने लोकलच्या वेगावरील निर्बंध दूर झाले आहेत. त्यामुळे आता सीएसएमटी ते वांद्रे हार्बर लोकलच्या वेगात आणि फेऱयांमध्येदेखील वाढ होणार आहे. या कामासाठी एकूण 2.44 कोटी रुपयांचा खर्च पश्चिम रेल्वेला आला आहे.
माहीम स्टेबलिंग यार्डचा वापर मध्य रेल्वेच्या लोकलना पार्क करण्यासाठी केला जात होता. वांद्रय़ाहून सीएसएमटीला सुटणारी पहिली लोकल येथूनच सोडली जायची. साल 2016 नंतर नवीन हार्बर लाइन तसेच तसेच स्टेबलिंग यार्डच्या स्थापनेनंतर काही तांत्रिक अडचणी आणि वेगनिर्बंधामुळे या माहीम यार्डचा वापर बंद झाला होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या दोन लोकल फेऱया बंद पडल्या होत्या. त्यामुळे जून 2020 मध्ये माहीम यार्ड रिमॉडेलिंगचे कार्य हाती घेण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.
लोकलच्या वेगात असा वाढ होणार
माहीम उत्तर यार्डात अप हार्बर लाइनचा वेगावरील निर्बंध 20 कि.मी.प्रति तास वाढवून आता 30 कि.मी. प्रति तास करण्यात आला. तर माहीम दक्षिण यार्डात डाऊन हार्बर लाइनचा वेग निर्बंध 20 कि.मी. प्रति तास वाढवून आता 50 कि.मी.प्रति तास करण्यात आल्याने हार्बरचा वेग वाढेल. तसेच आता माहीम यार्डात आता 12 डब्यांच्या तीन लोकल पार्क करता येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या बंद केलेल्या दोन फेऱया सुरू करता येणार असून दोन्ही दिशेच्या लोकल गाडय़ांचा वेग वाढणार आहे.

























































