
अकोले तालुक्यातील राजूर येथे पोलिसांनी चार ट्रक स्वस्त धान्य पकडले आहे. संशयास्पद हालचाली व कागदपत्रांवर गोडाऊन किपरच्या सह्या नाहीत तसेच या ट्रकचे क्रमांक मुंबई पासिंग असल्याने राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार, हेड कॉन्स्टेबल भडकमवार यांनी चार ट्रक ताब्यात घेऊन तहसीलदारांना घटनेचा तपशील दिला आहे.
राजूर येथे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चालक हौशीराम देशमुख 218 बॅग 50 किलोप्रमाणे धान्य, चालक साई धुमाळ 149 बॅग 50 किलोप्रमाणे, चालक योगेश धुमाळ 206 बॅग 50 किलोप्रमाणे, चालक अशोक देशमुख 203 बॅग 50 किलोप्रमाणे धान्य असलेल्या चार ट्रक संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तहसील पुरवठा विभागाकडे चौकशी केली असता, गाडे ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमधून दुसऱया टप्प्याचे हे धान्य पोहोचविण्यासाठी अन्नधान्य वाहतुकीसाठी परवानगी देण्यात यावी, असे पत्र दिले होते. त्याप्रमाणे पुरवठा विभागाने कार्यवाही केली होती. मग या ट्रकमधून का धान्य नेण्यात आले? त्यात परमिटवर गोडाऊन किपर यांची सही नसल्याने मोठा संशय व्यक्त होत आहे.
सध्या कोरोनामुळे आदिवासी भागातील जनतेला धान्य मिळत नसताना या धान्याचा परस्पर विक्रीचा संशय आल्याने राजूर पोलिसांनी हे ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. याबाबत तहसीलदार यांनाही पत्र देऊन मालाची तपासणी करून पुढील कार्यवाहीचे आदेश व्हावेत, असे कळविले आहे.































































