अध्यक्षाविना राज्य मानवी हक्क आयोगाचे कामकाज ठप्प; दोन सदस्यांची पदेही रिक्त, गृहविभागाकडून अजून शिफारस नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

राज्यातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणारा राज्य मानवी हक्क आयोगच सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मानवी हक्क आयोगावर अध्यक्ष व दोन सदस्यांच्या नियुक्त्या करण्यास राज्याच्या गृह विभागाकडून विलंब होत असल्याने आयोगाचे कामकाज सध्या पूर्णपणे ठप्प झाले आहे. राज्यातील आमदार, खासदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, जेल किंवा पोलिसांकडून अन्याय झाला तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोग स्थापन झाला. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास अगदी साधे पत्र पाठवून लोकसेवकाच्या विरोधात आयोगाकडे तक्रार करता येते. आतापर्यंत आयोगाने असंख्य लोकांना न्याय मिळवून दिला आहे. पण सध्या या तीन नियुक्त्या व रिक्त पदे यामुळे आयोगाचे कामकाज थंड पडले आहे, असे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.

आयोगावर न्यायमूर्ती

आयोगावर एक अध्यक्ष व दोन सदस्य असतात. अध्यक्ष हे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती असतात, तर एक सदस्य न्यायिक संस्थेतील तर अन्य सदस्य मानवी हक्क क्षेत्रातील तज्ञ असते. आयोगाचे सदस्य एम. ए. सय्यद यांच्याकडे काही महिने आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला होता; पण आता सय्यद यांचा पाच वर्षांचा कार्यकाल एप्रिलमध्ये संपुष्टात आला आहे, पण नव्याने नियुक्त्या करण्याबाबत हालचाली सुरू झालेल्या नाहीत.

कामकाज ठप्प

मध्यंतरी राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिवपद रिक्त होते. त्यानंतर या पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंढे यांच्या नियुक्तीनंतर आयोगाच्या कामकाजाला वेग येईल असे वाटत होते.

दररोज तक्रारींचा पाऊस

राज्य मानवी हक्क आयोगाकडे दररोज किमान पन्नास तक्रारी येतात.  आयोगाने आतापर्यंत असंख्य लोकांना न्याय दिला आहे; पण आयोगाकडे दुर्लक्ष होत असल्याने आतापर्यंत वीस हजारांपेक्षा अधिक केसेस प्रलंबित आहेत.

अशी होते नियुक्ती

आयोगाचे अध्यक्ष व दोन सदस्यांची नियुक्ती राज्याच्या गृह विभागामार्फत होते.  गृह विभागामार्फत राज्यपालांकडे या नावांची शिफारस होते.

न्यायव्यवस्थेकडे थेट आवाज

मुंबई उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, ग्राहक मंच, मॅट, अपघात दावा किंवा रेरा अशा मंचावर वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडावे लागते; पण सर्वसामान्य माणूस स्वतŠ आपले म्हणणे थेट आयोगाकडे मांडू शकतो.