मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी! केईएम रुग्णालयात 36 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात येत असला तरी म्युकरमायकोसिसचा धोका मात्र वाढत आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात एका 36 वर्षीय पुरुष रुग्णाचा रविवारी रात्री मृत्यू झाला आहे. तर मुंबईत एकूण रुग्णांची संख्या 150 वर पोहोचली आहे. या रुग्णांवर पालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी साधावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

कोरोना नियंत्रणात येत असतानाच कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस आजार होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणाऱ्या या बुरशीजन्य आजारामुळे जिवालाही धोका असतो. कोविड आजारात जास्त प्रमाणात घेतलेली स्टिरॉइड, टोसिलीझुमॅबचा अतिवापर यामुळे या आजाराचा धोका वाढतो. प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांसह कॅन्सर, किडनी, डायबेटिस, बोन मॅरो डिप्रेशन, थॅलेसेमिया असे आजार असणाऱ्यांना या आजाराचा धोका जास्त असतो. प्रसंगी ऑपरेशन करावे लागते. अशा धोकादायक आजाराचे मुंबईत सध्या रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पालिकने ‘म्युकर मायकोसिस’ला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी प्रमुख चारही रुग्णालयांसह सहा जम्बो कोविड सेंटरमध्ये ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. तर लवकरच स्पेशल म्युकर मायकोसिस वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

अशी आहेत लक्षणे

डोळे चुरचुरणे-दुखणे, लाल होणे, स्राव येणे, दृष्टी कमी होणे, नाकातून दुर्गंधी येणारा स्राव येणे, नाक दुखणे, श्वास घेण्यास त्रास, बुरशीजन्य काळा स्राव वाहणे अशा लक्षणांनंतर हा आजार मेंदूवरही आघात करतो.

सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया

डोळ्यांसह नाक आणि मेंदूवर म्युकर मायकोसिस वेगाने प्रभाव करतो. डोळय़ात इन्फेक्शन वाढल्यास डोळे गमावण्याची वेळ येते. त्यामुळे पालिकेच्या केईएम रुग्णालयात आतापर्यंत सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून इन्फेक्शन काढून टाकण्यात आले आहे. केईएममध्ये सध्या 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मृत्यू झालेल्या रुग्णाला इतर अनेक आजार होते.

म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी 30 कोटींचा निधी

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिसच्या संसर्गाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजारावरील उपचार महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतून करण्याचे तसेच त्यासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पवार यांनी आज कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा  घेतला. त्यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था  तातडीने उभारण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले.