
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय आल्यास चाचणी करण्यासाठी आता काळजी करण्याची गरज नाही; कारण आता आपण घऱच्या घरीच स्वत:ची कोरोना चाचणी करू शकतो. याकरिता होम बेस्ड टेस्टिंग किटला (इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) आयसीएमआरने मान्यता दिली आहे.
आयसीएमआरने मान्यता दिलेल्या होम बेस्ड टेस्टिंग किटला ‘रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट (RAT)’ असे म्हणतात. या किटच्या माध्यमातून घरीच नाकातील स्वॅब नमुने घेऊन कोरोनाची चाचणी लोकं करू शकतात.
यासाठी ‘होम टेस्टिंग मोबाईल अॅप’ हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागेल. या अॅपद्वारे कोरोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा कोरोनाच्या दोन्ही चाचण्या मिळू शकतात.
तसेच महत्त्वाचे म्हणजे जे होम टेस्टिंग करतात त्यांना टेस्ट स्ट्रिप फोटो काढावा लागेल. हा फोटो त्याच मोबाईलवरून घ्यावा लागेल ज्या मोबाईलमध्ये होम टेस्टिंग अॅप आहे. ही माहिती आयसीएमआर टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर केली जाईल. या होम टेस्टिंगचे वैशिष्ट्य असे की, रुग्णाच्या माहितीबाबत गोपनियता पाळली जाईल. या टेस्टमुळे ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह येईल, त्या रुग्णाला कोरोना पॉझिटिव्ह समजले जाईल.
जे रुग्णं पॉझिटिव्ह असतील त्यांना आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करावे लागेल. पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड या कंपनीला आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी अधिकृत मानले गेले आहे. कोविसेल्फ (COVISELF) असे या किटचे नाव आहे. हे होम टेस्टिंग फक्त सिम्प्टोमेटिक म्हणजे ज्यांना कोविडची लक्षणे दिसत आहेत, अशा रुग्णांसाठीच आहे.




























































