ओएनजीसी दुर्घटना- 60 तासांनंतरही नौदलाकडून बचावकार्य सुरूच; 49 जणांचा मृत्यू, 26 जण बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तौकते’ चक्रीवादळाच्या तडाख्याने ओएनजीसीजवळील बार्ज बुडून झालेल्या दुर्घटनेतील 26 जणांचा शोध 60 तासांनंतरही नौदलाकडून सुरू असून आतापर्यंत या दुर्घटनेत 49 जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या बचावकार्यात ‘आयएनएस कोची’सह पाच युद्धनौका सहभागी आहेत. दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टय़ामुळे तयार झालेल्या ‘तौकते’ चक्रीवादळामुळे मुंबईपासून 175 किलोमीटर सागरी मैलावर असलेल्या हिरा ऑईल फिल्ड या ओएनजीसीच्या परिसरात बार्ज बुडल्यामुळे एकच हाहाकार उडाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुसळधार पावसात आणि वादळाची पर्वा न करता ‘आयएनएस कोची’सह पाच युद्धनौका सहभागी झाल्या. त्यांनी जिवाची बाजी लावत 184 कर्मचाऱयांना वाचवले. हे कर्मचारी बुधवारी मुंबईत परतले, मात्र इतरांचा शोध सुरूच होता. सुरुवातीला ‘पी-305’ या बार्जवर असलेले 274 कर्मचारी बुडाल्याचे म्हटले जात होते, मात्र आता या बार्जवर 261 कर्मचारी असल्याची माहिती नौदलाने दिली आहे. बचावकार्याचा आजचा चौथा दिवस असून पाच युद्धनौकांबरोबर 6 हेलिकॉप्टर्स आणि 3 टोही विमाने हे बचावकार्य करत आहेत.

इतर 3 जहाजांवरील सर्व कर्मचारी सुरक्षित

‘पी-305’ या बार्जसह इतर तीन जहाजेही ‘तौकते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडली होती, मात्र या तीनही जहाजांवरील कर्मचारी सुरक्षित असल्याचे नौदलाने म्हटले आहे. ‘जीएएल कन्स्ट्रक्शन’ यावर 137 कर्मचारी, ‘एसएस-3’ वर 202 आणि ‘सागर भूषण’वर 101 कर्मचारी आहेत. मात्र हे सर्व सुरक्षित असून त्यांच्या जेवण-खाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती नौदलाने दिली.

ओएनजीसीच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- नवाब मलिक यांची मागणी

‘तौकते’ चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळूनही ओएनजीसीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे 37 कर्मचाऱयांचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज केली.

‘तौकते’ चक्रीवादळाचा धोका असल्याचे सरकार आणि संबंधित यंत्रणेने जाहीर केले असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष करून  700 कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यातील एक बार्ज बुडून 37 कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही 40 कामगार बेपत्ता आहेत. शेकडो कामगार अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना  नौदलाने आणि तटरक्षक दलाने सुखरूप बाहेर काढले. पण या घटनेला ओएनजीसी जबाबदार आहे, असा आरोप मलिक यांनी केला. दरम्यान, पेंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी चौकशी समितीची घोषणा केली.