
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा इशारा आरोग्यतज्ञांकडून दिला गेला असतानाही मुंबईत अजूनही लोक मास्क वापरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईत दररोज शेकडो जणांवर कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षी 22 मार्चपासून सुरू केलेल्या या कारवाईत आतापर्यंत 27 लाख 58 हजार 649 जणांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना रोखण्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे-सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करून गेल्या वर्षी 22 मार्चपासून मास्क न वापरणाऱयांविरोधात धडक कारवाई सुरू केली. सुरुवातीला तर या कारवाईत एक हजाराचा दंड वसूल करण्यात येत होता, मात्र काही दिवसांतच हा दंड 200 रुपये करण्यात आला. कोरोनाला रोखण्यासाठी क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली. शिवाय पोलिसांनाही या कारवाईचे अधिकार देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वेच्या तिन्ही लाइनवरदेखील कारवाई सुरू आहे.
अशी झाली कारवाई
- पालिकेने क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत आतापर्यंत सर्वाधिक 23 लाख 96 हजार 249 जणांवर कारवाई केली असून 48 कोटी 28 लाख 80 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
- मुंबई पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत 3 लाख 38 हजार 509 जणांवर कारवाई करून 67701800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाइनवर आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत 23,891 जणांवर कारवाई करून 50 लाख 39 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
निर्बंध काळातही बेजबाबदारपणा
कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घालून कठोर अंमलबजावणीस सुरुवात केली, मात्र या काळातही शेकडो मुंबईकर मास्क वापरत नसल्याचे समोर आले आहे. दररोज दीड हजार जणांवर कारवाई करून 200 रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. 23 मे रोजी 1828 जणांवर कारवाई करून 3 लाख 65 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
































































