मराठा आरक्षणासाठी भाजप मोर्चे काढणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना भाजपकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले जात आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱया मोर्चांमध्ये भाजप सहभागी होणार आहे. आरक्षण प्रश्नाचा राजकीय लाभ उठवण्याच्या तयारीत भाजप आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा मोर्चात सहभागी असल्याचे सांगून यामध्ये राजकीय उडी घेतली

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी भाजपची भूमिका सांगितली.ते म्हणाले, कोणताही नेता किंवा संघटना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणार असेल, तर भाजप त्यात सहभागी होऊन मोर्चामध्ये उतरेल.पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हेदेखील त्यामध्ये सहभागी होतील.

मराठा आरक्षण गेल्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत प्रदीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला सवलती द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठा समाज मागास आहे आणि 50 टक्क्यांच्या वर जाऊन या समाजाला आरक्षण देण्यासारखी अपवादात्मक स्थिती आहे. हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.