
100 कोटींच्या वसुली प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मंगळवारी आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या तीन निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकून झडती सुरू केली आहे. शिवाजी नगरातील सागर भटेवरा, सदर येथील सुमित आयझॅक यांच्यासह जाफर नगरातही आणखी एका ठिकाणी ईडीच्या टीमकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
भटेवरा आणि आयझॅक हे अनिल देशमुखांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार मानले जातात. याची कुणकुण लागल्यानंतर ईडीने हा छापा टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सक्तवसुली संचालनालयाची टीम यासंदर्भातील कागदपत्रे चाळत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या विरोधात प्राथमिक तपास करून त्या आधारावर 21 एप्रिलला सीबीआयच्या दिल्ली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात महाराष्ट्रातील अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने सीबीआयने यापूर्वी मुंबई आणि नागपूर येथील त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयावर छापे टाकले होते. सीबीआयने या तपासात मनी लॉण्डरिंगचीही शंका व्यक्त केली होती. त्याचा छडा लावण्यासाठी सीबीआयने ही माहिती सक्तवसुली संचालनालयाला दिली. याच आधारावर याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना याप्रकरणी लवकरच चौकशीकरता पाचारण केले जाण्याची शक्यता बळावली आहे.
































































