सकारात्मक विचारांच्या बळावर 69 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेत असतानाच 69 वर्षीय रानडे आजोबांना सर्दी, खोकला व बारीक ताप अशी कोरोनासदृश लक्षणांचा त्रास जाणवू लागला. तपासणीअंती त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. एचआरसीटी स्कोअर 20 आणि सीआरपी 170 असल्याने प्रकृती नाजूक होती. मात्र प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचारांच्या बळावर आजोबांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.

कोरोनासदृश लक्षणे असल्याने रानडे यांची तपासणी करून त्यांना औषधे दिली. त्यावेळी विशेष काही जाणवले नाही, मात्र अचानक प्रकृती खालावल्याने त्रास जाणवू लागला. छातीमध्ये संसर्ग झाल्याने तत्काळ रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे रानडे यांच्या कुटुंबातील सदस्य काळजीत पडले.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील रुग्णालयांत बेड शिल्लक नाहीत. त्यात बेड मिळेल का? या चिंतेत नातेवाईक होते. घाबरू नका. अशा वेळी रानडे आजोबांनी मला काहीही होणार नाही, काळजी करू नका. बेड नक्की मिळेल, असे सांगत कुटुंबीयांना धीर दिला. उपचारासाठी त्यांना दत्तवाडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल होताना रानडे आजोबांची प्रकृती बिकट होत होती. ऑक्सिजन सपोर्ट 12 लिटरपर्यंत लागत होता. असा त्यांनी दाखवलेला स्वतःवरचा विश्वास तसेच डॉक्टरांनी केलेल्या उत्तम उपचारांमुळे ते 19 दिवसांत बरे झाले.