दुधात भेसळ करणारी टोळी श्रीरामपुरात गजाआड, भुकटीच्या पिशव्या भरलेला टेम्पो जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुधात भेसळ करणाऱया टोळीला गजाआड करण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले असून, भेसळीसाठी वापरल्या जाणाऱया दूधभुकटीची 59 पाकिटे असलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली, परंतु अन्न आणि औषध तपासणी पथक न आल्याने अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही.

श्रीरामपूर शहरातील अशोक टॉकिज परिसरात दोन रहिवाशांमध्ये रात्रीच्या वेळी भांडण झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, पोलिसांना एका टेम्पो दिसला. टेम्पोमध्ये 25 किलो वजनाच्या दूधभुकटीच्या पिशव्या आढळून आल्या. भेसळीसाठी ही पावडर दुधात मिसळली जाते. पोलिसांनी टेम्पोसह पावडर पिशव्या जप्त केल्या.

गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला रात्रीच माहिती दिल्याची नोंद स्टेशन डायरीत पोलिसांनी घेतली. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभरात अन्न आणि औषध तपासणी पथकाला पोलिसांकडून तीन ते चार वेळा संपर्क केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.