
पालिकेच्या पी/नॉर्थ वॉर्डातील कनिष्ठ अभियंत्याने घराच्या बांधकामावर कारवाई होऊ द्यायची नसल्यास 1 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसुख (नाव बदललेले) यांच्या मालाड मालवणी येथे राहणाऱ्या भावाच्या घराचे छत व इतर बांधकाम सुरू होते. ही माहिती मिळताच पी/नॉर्थ वॉर्डचे कनिष्ठ अभियंता संतोष पवार यांनी तेथे जाऊन घराच्या बांधकामाचे फोटो काढले तसेच हे बेकायदेशीर बांधकाम असल्याचे सांगून भेटण्यास बोलावले. त्यानुसार मनसुख पवार यांना भेटले असता बांधकामावर कारवाई होऊ द्यायची नसल्यास 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी 30 हजार रुपयांचा हप्ता संतोष पवार यांनी घेतला, मात्र त्यानंतर उर्वरित पैसे देण्याचा त्यांनी तगादा लावला होता. पवार यांना लाच द्यायची नसल्याने मनसुख यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार संतोष पवार यांच्या वतीने 50 हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसम अब्दुल आहद खान याला अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले.



























































