
खेड तालुक्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांबरोबरच काही गावातील सरपंच, ग्रामस्थ आणि कृतीदलाच्या सदस्यांनी घेतलेली खबरदारी आणि केलेल्या उपाययोजना यामुळे तालुक्यातील 200 पैकी 8 गावांनी कोरोनाला आपल्या सीमेबहेरच रोखले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा तीव्र आहे. या लाटेत ग्रामीण भागातील जनता होरपळून निघाली. तालुक्यातील 200 पैकी तब्बल 192 गावांमध्ये कोरोनाने थैमान घातले. एक दोन गावांमध्ये तर संपुर्ण कुटुंबच कोरोनाचे बळी ठरले. तालुक्यातील सर्व कोवीड केअर सेंटर्स, रुग्णालये कोरोनाबाधितांनी भरून गेली. रुग्णालयात रुग्णांना बेडही मिळेनाशी झाली.
खेड तालुक्यातील 200 गावांपैकी 8 गावांनी कोरोनाला वेशीच्या आत प्रवेश दिलेला नाही. ज्या गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखले त्या गावांमध्ये खाडीपट्ट्यातील सवणस, मुळगाव, कर्जी, चौगुले मोहल्ला, तुंबाडसह खाडीपट्ट्यातील अन्य तीन गावांचा समावेश आहे. या गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या उपाययोजना आणि खबरदारीमुळे या आठ गावांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. ज्या आठ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले त्या गावांपैकी सवणस आणि मुळगाव या दोन गावांमध्ये 290 कुटुंब असून 1046 लोकसंख्या आहे. कर्जी गावात 344 कुटुंब असून लोकसंख्या 1697 इतकी आहे तर तुंबाड मध्ये 231 कुटुंब असून 709 लोकसंख्या आहे. तुळशी खुर्द व बुद्रूक या गावामध्ये 242 कुटुंब असून 770 लोकसंख्या आहे. या गावातील ग्रामस्थांनी घेतलेल्या खबरदारीमुळे या गावातील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही.


























































