
कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) आणखी नवे आठ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या 70 वर गेली आहे. आतापर्यंत यातील 5 रुग्ण दगावले आहेत, तर 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, ‘सीपीआर’मधील म्युकरमायकोसिसचे दोन्ही वॉर्ड फुल्ल झाल्याने आणखी नवे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर उपचारासाठी बेड उपलब्ध करण्याची धावाधाव सुरू होती.
कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेचा भयंकर परिणाम दिसून येत असतानाच, देशात सर्वत्र म्युकरमायकोसिसचे संकट आले आहे. जिह्यात महिनाभरात आतापर्यंत तब्बल 70 रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या 10 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यातील 5 रुग्ण दगावले आहेत. तर, सध्या 55 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ‘सीपीआर’मध्ये यासाठी दोन वॉर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून, येथे सध्या 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय आतापर्यंत ‘सीपीआर’मधील 10 रुग्णांवर शस्त्र्ाक्रिया करण्यात आली असून, उर्वरित रुग्णांवर शस्त्र्ाक्रिया करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती ‘सीपीआर’चे कान, नाक, घसातज्ञ डॉ. अजित लोकरे यांनी दिली.
दरम्यान, शासनाने जिह्यातील, डी. वाय. पाटील, ऍपल, डायमंड आणि सिद्धगिरी या चार, तर बेळगावमधील केएलई रुग्णालयामध्ये ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेतून मोफत उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे.

























































