
कोरोनाच्या व्हायरसशी लढणाऱया जनतेला आता महागाईच्या महासाथीशी लढावे लागत आहे. मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हे आणि देशभरात अनेक ठिकाणी पेट्रोल शंभरीपार गेले आहे, तर डिझेलचीही सतत दरवाढ सुरू आहे. इंधन दरवाढीबरोबरच इतर वस्तूंचेही भाव वाढले आहेत. महागाईचा अकरा वर्षांतील रेकॉर्डब्रेक झाला आहे.
पश्चिम बंगालसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर एक दिवसाआड इंधन दरवाढ होत आहे. 4 मेपासून 14 वेळा इंधनाचे दर वाढले. या काळात पेट्रोल प्रतिलिटर 3.28 रुपये तर डिझेल 3.88 रुपयांनी महागले आहे.
इंधन दरवाढीचा थेट परिणाम मालवाहतुकीवर
- इंधन दरवाढीचा विशेषतः डिझेल महाग झाल्याने त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीवर होतो. पर्यायाने फळे, भाज्या, धान्य, खाद्यतेलात मोठी वाढ होते. त्यामुळे याचा फटका मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेला बसत आहे.
- एलपीजी सिलिंडरचा दर 810 रुपयांवर गेला आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे आधीच घरातील किचनचे बजेट कोलमडले आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती 70 डॉलर्स खाली
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर अमेरिका, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांमध्ये अनलॉक होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला मागणी वाढली आहे. ही मागणी वाढली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किंमती 66 ते 68 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत आहेत. मग 70 डॉलर्स प्रति बॅरलपेक्षा कमी कच्चे तेल असताना हिंदुस्थानात पेट्रोल-डिझेल एवढे महाग का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शनिवारी पेट्रोल 28 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचा दर 100 रुपये 19 पैसे, तर डिझेल 92 रुपये 17 पैसे प्रतिलिटर असा झाला आहे. पुण्यात पेट्रोल 100.15 रुपये तर डिझेल 90.44 रुपयांवर गेले आहे.
अकरा वर्षांतील रेकॉर्डब्रेक
इंधन दरवाढीबरोबरच घाऊक बाजारात महागाईने 11 वर्षांतील रेकॉर्डब्रेक दर गाठला आहे. होलसेल प्राइस इन्फ्लेॊशन (डब्ल्यूपीआय) एप्रिलमध्ये तब्बल 10.49 टक्क्यांवर गेले आहे. किरकोळ (रिटेल) महागाई दर 4.29 टक्के असला तरी त्यात मोठी वाढ होईल.
विमान प्रवासही महागला
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे रस्ते प्रवास महागला असतानाच केंद्र सरकारने विमान प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. सरकारने देशांतर्गत विमान प्रवासाचे किमान भाडे 13 ते 16 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास विमान कंपन्यांना मंजुरी दिली आहे. ही दरवाढ 1 जूनपासून लागू होणार आहे. 40 मिनिटांच्या प्रवासाचे किमान भाडे 2300 रुपयांवरून 2600 रुपये; तर 180 ते 210 मिनिटांपर्यंतच्या सर्वात लांबच्या प्रवासासाठी 7600 रुपयांऐवजी कमीत कमी 8700 रुपये मोजावे लागतील.



























































