
आता कोरोनाच्या साथीचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला सुरू आहे. 100 वर्षांनी दुर्दैवाने अशीच कुठली साथ आली तर तेव्हा कोणती लस दिली, कोणती लस प्रभावी होती, लस घेतल्यावरही कोरोनाचा संसर्ग झाला का, विषाणूमध्ये कोणता बदल झाला यासह उपचारांचा डेटा तयार करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील डॉक्टरांना केले. औषधांचा अनाठायी व अतिरेकी वापर टाळा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेडिकल कैन्सिलने दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या ऑनलाईन परिषदेसाठी 21 हजार 500 डॉक्टरांनी नोंदणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना काही सूचना केल्या.
100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूच्या साथीत नाकावर रुमाल बांधलेले लोक फोटोत दिसतात. आताही 100 वर्षांनंतर आपल्या हातामध्ये मास्क हीच महत्त्वाची ढाल आहे. पुढे 100 वर्षांनी अशी साथ येऊ नये; पण दुर्दैवाने अशी साथ आली तर महाराष्ट्रात या साथीची तीव्रता किती होती, महाराष्ट्राने तेव्हा काय खबरदारी घेतली याचा पुढील 100 वर्षांनी डेटा उपलब्ध असणे गरजेचे आहे. तुमचे आताचे प्रयत्न तेव्हाही उपलब्ध असले पाहिजेत. कोरोनावर काही औषधे वापरत आहोत, काही प्रभावी ठरत आहे, काही प्रभावी ठरत नाहीत याची नोंद असली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
लस घेतल्यावरही कोरोना झाला का?
मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याकडे येणाऱया रुग्णाने लस घेतली आहे का, कोणत्या लसीचे किती डोस घेतले, किती दिवस झाले आणि जर रुग्ण लवकर आला असेल त्याच्यातील अँटीबाँडीज पण तपासून बघा. लस घेतल्यावरही त्याला कोरोना झाला का याची आपल्याकडे नोंद असणे गरजेचे आहे.
म्युकरचा वेगान संसर्ग
पूर्वीचा संसर्ग आणि सध्याचा संसर्ग यात फरक आहे. आताचा संसर्ग हा म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे पसरत असून त्याचा वेग खूप जास्त आहे. शिवाय रुग्णांवरही जास्त उपचार करावे लागत आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्युकरमायकोसिस वेगाने पसरतो आहे याचाही त्यांनी संदर्भ दिला.
लहान मुलांची काळजी घ्या
- दुसऱया लाटेत तरुणवर्गात मोठय़ा प्रमाणात संसर्ग दिसतोय, तर तिसऱया लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यादृष्टीने अधिक सावधानता बाळगली पाहिजे असेही सांगितले.
- परिषदेचे प्रास्ताविक महाराष्ट्र मेडिकल काwन्सिलचे अध्यक्ष
- डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी, तर डॉ. अर्चना पाटे यांनी सूत्रसंचालन केले. या ऑनलाइन परिषदेसाठी 21 हजार 500 डॉक्टर्सनी नोंदणी केली आहे.
- दोन दिवसांच्या या कार्यशाळेत कोविड संसर्गाचे बदलते स्वरूप, गृहविलगीकरण, संभाव्य तिसरी लाट, लसीकरण, म्युकरवरील उपचार अशी विविध विषयांवर चर्चा होईल.
कोरोना रुग्णाला वेळीच ओळखा
सर्वसामान्य रुग्ण पहिल्यांदा त्याला कोणताही त्रास झाला की, आपल्या फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी जातो हे लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
कोविडची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाहीत. अशा वेळी तुमच्यावर योग्य रीतीने अशा रुग्णास ओळखण्याची जबाबदारी आहे.
विशेषतः प्राथमिक आणि मध्यम अवस्थेतील आणि ज्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते आपण पाहिले पाहिजे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे त्याकडेही डॉक्टर्सनी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे.
































































