
>> भालचंद्र देशपांडे
सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट आले आहे. डॉक्टरांना पेशंटला तपासून औषधे सुचविण्याचे प्रचंड काम करावे लागत आहे. तशात डॉक्टरांचा खूप तुटवडा आहे. लोकांना लहानमोठे आजार होतच असतात. कोरोनाचे पेशंट वाढल्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड अपुरे पडत आहेत, अशावेळी कम्पाऊंडर, वॉर्डबॉय आणि नर्सेस यांची मदत तुम्हाला जरूर होईल. ही अतिशय महत्त्वाची माणसे आहेत. ती सतत डॉक्टरांबरोबर मदतनीस म्हणून असतात आणि डॉक्टरसुद्धा त्यांचा योग्य सन्मान राखतात. ते असतात म्हणून डॉक्टर काम करू शकतात.
काही वर्षांपूर्वी आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना हर्नियाचे दुखणे होते. त्यांचे बरेच वय असल्याने ऑपरेशन अवघड होते. तेव्हा मुंबईहून प्रसिद्ध सर्जन डॉ. श्रीखंडे यांना दिल्लीला बोलावण्यात आले आणि डॉ. श्रीखंडे यांनी आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन यशस्वीरीत्या केले.
डॉ. श्रीखंडे सर्जन झाल्यावर पुढील शिक्षणाकरिता लंडनला गेले. काही काळ लंडन येथे हॉस्पिटलमध्ये काम करीत होते, परंतु मुंबईला आल्यावर कॉलनी नर्सिंग होमला सर्जरी करू लागले. डॉ. श्रीखंडे यांनी आपले आत्मचरित्र ‘आणि दोन हात’ या नावाने 2009 साली प्रसिद्ध केले. त्यातील एक उतारा खाली देत आहे.
‘‘लोकसंख्येच्या वाढीला लगाम घालण्याकरिता नसबंदी या कार्यक्रमावर एकेकाळी फार मोठा भर देण्यात आला होता. या शस्त्रक्रिया केल्यानंतर ही तोडलेली नस पुन्हा जोडता येत नाही किंवा त्या व्यक्तींच्या पौरुषत्वामध्ये कमतरता येते. या दोन धोक्यामुळे शस्त्रक्रिया करून घेण्यास चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. कापलेली नस पुन्हा जोडता येते हे गेल्या पिढीतील ख्यातनाम सर्जन डॉ. जी. एम. फडके यांनी दाखवलं व मानव जातीला एक मोठी देणगी दिली. पाश्चात्य राष्ट्रामध्ये नसबंदीच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या. ती कापलेली नस पुन्हा जोडून यश देत नाही असा त्यांच्यामध्ये समज होता. ही शस्त्रक्रिया हिंदुस्थानमध्ये मी परत आल्यानंतर शिकलो. माझे दोन गुरू म्हणजे हिंदू कॉलनीतील डॉ. फडके यांच्या ‘कॉलनी नर्सिंग होम’मधला सखाराम नावाचे थिएटर असिस्टंट व तिथले आरएमओ डॉ. विनायक शिंदे, डॉ. जी. एम. फडके 1964 मध्ये वारले. मला सर्जरी करण्याकरिता नर्सिंग होमची गरज होती. ती संधी डॉ. अजित फडके यांनी मला दिली. फडके कुटुंबाचा मी ऋणी आहे. मी कॉलनी नर्सिंगमध्ये काम सुरू केले. डॉ. विनायक शिंदे व सखाराम मला बोलता बोलता म्हणाले, ‘साहेब तुमचा हात फार चांगला आहे. तुमचं काम बघून डॉक्टर साहेबांची आम्हाला आठवण येते. तुम्ही ही ऑपरेशन का करत नाही?’’
माझं उत्तर होतं, ‘‘मला करता येत नाही.’’
ते म्हणाले, ‘‘आम्ही तुम्हाला शिकवू’’ आणि मी शिकलो. कोकणामधला सखाराम दोनचार इयत्ता शिकला होता व डॉ. शिंदे यांनी आयुर्वेदामध्ये डिप्लोमा घेतला होता. त्यांच्याकडून मी जे शिकलो त्याने मला संपूर्ण हिंदुस्थानमध्ये व हिंदुस्थानबाहेरदेखील नाव मिळवून दिलं. सखाराम व डॉ. विनायक शिंदे यांचा ऋणी आहे.’’
मी 1976 साली साबणाची फॅक्टरी चालू केली. त्यात एक प्रकारचे द्रवरूप सोप, एनिमा सोप, पोटॅशिअम सोप वगैरे तयार करत असे. मी मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटलस्, टाटा पॅन्सर हॉस्पिटल, हाफकिन इन्स्टिटय़ूटबरोबर बरीच वर्षे काम केले. हाफकिन इन्स्टिटय़ूट ‘हाफकिनॉल’ नावाचे अॅन्टीसेप्टीक सोल्यूशन बनवत असे. ते तर खूपच छान होते. त्यांना पोटॅशिअम पॅस्टर ऑईलसोप रॉ मटेरिअल म्हणून सप्लाय करत असे.
मला इथे नमूद करावेसे वाटते की, माझ्या फॅक्टरीत बी.आय.एस. मान्यताप्राप्त अॅनेलॅटिकल लॅबोरेटरी मेन्टेन केली होती. बरीच वर्षे मी वरील संस्थांचा सप्लायर म्हणून संपर्कात होतो. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांचे काम मी जवळून पाहिले आहे. सगळेजण अनुभवी व हुशार असतात व पेशंटला मदत करायला नेहमीच तत्पर असतात. नर्सेस शिरेतील इंजेक्शन इतके सफाईने देतात की पेशंटला वेदना होत नाही, डॉक्टरांच्या गैरहजेरीत पेशंट जर सिरिअस झाला तर ताबडतोब त्याला प्रथमोचार नर्सेसच करतात.
कोरोनाचे संकट लवकरच दूर होईल, धीर धरा चांगले दिवस लवकरच नक्की येतील. म्हणतात ना की ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल!’




























































