पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात सोमवारी दुपारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड ते दोन तास मेघगर्जनेसह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात बहुतांश रस्ते जलमय झाले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. दरम्यान, शनिवारी 5  जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दुपारी अडीचच्या सुमारास ढग दाटून आले. त्यानंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच अवघ्या काही वेळातच रस्त्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. शहरात काही सखल भागांत पाणी साचले होते, तर लहान रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. जोराचा पाऊस आणि रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

शनिवारपर्यंत पाऊस पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील चार दिवस पूर्वमोसमी पाऊस कोसळेल. मंगळवारपासून  शनिवारपर्यंत  शहरात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.