
राहाता तालुक्यातील 29 हजार 660 शेतकऱयांनी हवामान आधारित फळबाग पीकविमा तसेच पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र, यापैकी अवघ्या 750 शेतकऱयांना 88 लाखांचा परतावा विमा कंपनीकडून मिळाला आहे.
शासनाकडून शेतकऱयांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना, तसेच फळबागांसाठी हवामान आधारित फळ पीकविमा योजना राबविल्या जातात. सन 2020-21 या वर्षासाठी तालुक्यातील 4 हजार 713 शेतकऱयांनी 3 हजार 192 हेक्टरसाठी हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत, तर 24 हजार 947 शेतकऱयांनी 17 हजार 556 हेक्टरवर खरीप पिकांसाठी विमा भरला होता. दोन्ही योजना मिळून तालुक्यातील 29 हजार 660 शेतकऱयांनी 20 हजार 748 हेक्टरसाठी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता.
पीकविमा कंपनीकडून अवघ्या 750 शेतकऱयांना सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी 88 लाखांचा पीकविमा परतावा दिला आहे. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच दमट हवामान, सातत्याने टिकून राहिलेली आर्द्रता, दररोजचा कमी-जास्त प्रमाणात पडणारा पाऊस यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले.

























































