सोलापूर भाजप मीडिया सेल जिल्हाध्यक्षाच्या हॉटेल ‘सागर’वर धाड, बेकायदा दारूचा साडेचौदा लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर भाजप मीडिया सेलचा जिल्हाध्यक्ष सागर लेंगरे यांच्या ‘सागर’हॉटेलवर मोहोळ पोलिसांनी धाड टाकून तब्बल 14 लाख 41 हजार रुपयांची बेकायदा दारू जप्त केली आहे. याप्रकरणी सागर लेंगरे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सागर अनंत लेंगरे (रा. सूळनगर, मोहोळ), केशव बळीराम माळी (रा. मोहोळ) या दोघांसह सज्जन किसन चवरे (रा. पेनूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक अशोक सायकर, नीलेश देशमुख, शरद ढावरे, पांडुरंग जगताप आणि शिवणे हे दुपारी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कन्या प्रशालेजवळील भाजप सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सागर लेंगरे यांच्या हॉटेल ‘सागर’मध्ये काहीजण दारूचे बॉक्स घेऊन कारमध्ये भरताना आढळले.

यावेळी सज्जन किसन चवरे (रा. पेनूर) यांच्याजवळ व वाहनात ठेवलेले 7650 रुपयांच्या दारूचे बॉक्स आढळले. यावेळी पोलिसांनी हॉटेल सागरमध्ये तपासणी केली असता 83,410 रुपयांच्या दारूचा बेकायदा साठा आढळून आला. पोलिसांनी दारूचे बॉक्स व मोटार असा 14 लाख 41 हजारांचा ऐवज जप्त केला. गेल्या महिनाभरापासून मोहोळ पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचा धडाका लावल्यामुळे खळबळ उडाली आहे.