
भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचा तपास अंतिम टप्प्यात असून, गुन्हे शाखेने दाखल्यासंदर्भात सर्वच ठिकाणी जाऊन सखोल चौकशी केली आहे. त्यासंदर्भातील स्वतंत्र अहवाल तयार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठल्यानंतर पुढील कारवाई होईल. याप्रकरणी 5 जुलैला उच्च न्यायालयात समिती म्हणणे मांडणार असल्याची माहिती जात पडताळणी समितीचे सहायक आयुक्त संतोष जाधव यांनी दिली.
खासदार डॉ. महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांच्यासह अन्य काहींनी केली होती. त्यानंतर समितीने सखोल चौकशी केली आणि दाखला बनावट असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर अक्कलकोटच्या तत्कालीन तहसीलदारांच्या फिर्यादीनुसार गुन्हाही दाखल झाला.
दरम्यान, खासदार डॉ. महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कारवाईला स्थगिती मिळवली. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार शहर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला. आता तो तपास अंतिम टप्प्यात आला असून, उच्च न्यायालयातून स्थगिती उठल्यानंतर त्यासंदर्भातील दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले जाईल, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.
































































