
कुडाळ तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारीही पावसाची संततधार सुरुच होती. दिवसभर सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस कोसळला. या पावसाने नदी, नाल्यांचे प्रवाह चांगल्याप्रकारे प्रवाहीत झाले आहेत. ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. भात पेरणीसह अन्य कामे ग्रामीण भागात जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
हवामान खात्याने अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गेले तीन दिवस या पथकाने दोन्ही तालुक्यातील पुरबाधित गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे.
शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणच्या भागात मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान रविवारीही सर्वत्र पावसाची जोरदार बॅटींग सुरुच होती. त्यामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. कुडाळ तालुक्यात गेल्या 24 तासात 36 मिमी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत तालुक्यात 216 मिमी. एवढी पावसाची नोंद आपत्कालीन कक्षात करण्यात आली आहे. जिल्यात चांगला पाऊस पडल्याने भात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असून आता भात लावणीच्या कामांना सुरूवात होणार आहे.



























































