पाऊस नाही, तर कडकडीत ऊन पडलं! व्वा रे गब्रू, सगळय़ांना फशीवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान खात्याने मुंबईला दिलेल्या ‘अतिमुसळधार’ पावसाच्या इशाऱयाला पावसाने आज चांगलाच चकवा दिला. मुसळधार पावसासाठी अरबी समुद्रात तयार झालेले ‘सर्क्युलेशन’ आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ‘कमकुवत’ झाल्याने अतिवृष्टी झाली नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. संपूर्ण मुंबईत अक्षरशः कडकडीत ऊन पडलं! त्यामुळे मुसळधार पावसाचा आनंद घेण्याची वाट पाहणाऱया मुंबईकरांचा मात्र हिरमोड झाला. दरम्यान, मुसळधार पावसासाठी आवश्यक असणारी हवामानाची ‘स्थिती’ उत्तरेकडे सरकल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, कर्नाटकला उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबईत 9 जून रोजी दाखल झालेल्या ‘मान्सून’ने सलामीलाच संपूर्ण शहराला अक्षरशः धू धू धुतले. रेल्वे मध्य-हार्बर लाइन ठप्प झाल्या. रस्ते वाहतूक खोळंबली. यातच पुन्हा 13 आणि 14 जून रोजी मुंबईत ‘अतिमुसळधार’ पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने  मुंबईकरांच्या उरात धडकी भरली होती. मुंबईत पालिका प्रशासनाने आपल्या आपत्कालीन यंत्रणेसह ‘एनडीआरएफ’, तटरक्षक दल, नौसेना, पोलिसांसह ‘अतिवृष्टी’चा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा तैनात ठेवली होती. मात्र हवामान खात्याच्या ‘अंदाजा’ला पावसाने चकवा दिला.

‘हाय अॅलर्ट’ यंत्रणांना ‘रिलॅक्स’चे आदेश

  • मुंबईसाठी देण्यात आलेला ‘अतिदक्षते’चा ‘रेड अॅलर्ट’वरून थेट केवळ ‘सावधगिरी’चा ‘यलो अलर्ट’ देण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
  • त्यामुळे ‘हाय अॅलर्ट’ यंत्रणांना ‘रिलॅक्स’चे आदेश देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे अधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितले. मुंबईत ‘अतिमुसळधार’ पावसाचा इशारा नसला तरी संपूर्ण पावसाळ्यासाठी तैनात असणारी पालिकेची यंत्रणा तैनात आणि सुसज्ज असल्यामुळे मुंबईकरांनी कोणतीही काळजी करू नये, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ‘स्थिती’ कमकुवत झाल्याने मुंबईत मुसळधार पाऊस झाला नाही. मात्र हा पट्टा आता उत्तर कोकणाकडे खाली सरकल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक या भागात उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट क्षेत्रात मुसळधार होऊ शकतो.
– कृष्णानंद होसाळीकर, हवामान विभाग अधिकारी