
कोरोनावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱया पाचगणी येथे रविवारी पुण्या-मुंबईवरून येणाऱया पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
पर्यटकांच्या वाहनांमुळे आशिया खंडातील सर्वांत मोठे पठार असलेल्या येथील टेबललॅण्डवर जाणाऱया रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत होते. दरम्यान, निर्बंध शिथिल झाले असले, तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे पर्यटकांनी सबुरीने घेण्याच्या सूचना स्थानिक करीत आहेत.
कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पाचगणीचे पर्यटन ठप्प झाले होते. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे स्थानिक दुकानदार व व्यावसायिकांसाठी आजचा रविवारचा दिवस सुट्टीचा पर्यटकांनी पाचगणी भरगच्च झाल्याने भलेही आनंद वाटला असला तरी तो तितकाच धोक्याचादेखील आहे. त्यामुळे पर्यटकांनी जरा सबुरीने टप्प्याटप्प्याने पर्यटनस्थळी दाखल होण्याची गरज स्थानिक व्यक्त करीत आहेत.
पाचगणी-महाबळेश्वर परिसरात पाच महिन्यांनंतर पर्यटकांची झालेली गर्दी पाहिल्यानंतर महाराष्ट्राचे नंदनवन पुन्हा एकदा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. हे पर्यटक पाचगणीच्या आल्हाददायक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत होते. दरम्यान, सातारा जिल्हा कोरोनाशी दोन हात करीत असताना पुण्या-मुंबईहून आलेल्या पर्यटकांनी पाचगणीमधील टेबललॅण्डवर जाण्यासाठी मोठी गर्दी केल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.

























































