
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना सोनगिरीजवळ टाकलेला भराव वाहून गेल्याने एका बाजूचा रस्ता खचला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर येथील रस्ता आणखी खचण्याची भिती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. मुबंई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात सोनगिरीजवळ अतिवृष्टीमुळे पाणी रस्त्यावर आल्याने हा रस्ता एका बाजूने खचल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू असून रस्ता आणखी खचण्याची भिती व्यक्त होत आहे.
या मार्गाचे काम करणाऱ्या जे. एम. म्हात्रे कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत आहेत. या भागातील जुन्या मोऱ्यांचा पाणी वाहून नेणारा भाग मातीखाली असल्याने पावसाचे पाणी जाण्यास जागाच राहिलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी महामार्गावर आल्याने रस्ता खचल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्गाचे चौपदरीकरण करताना भरावाची माती नदीकडील बाजूला टाकली जात आहे. त्यामुळे माती टाकताना पूर्वीच्या मोऱ्या बुजत असल्याने पावसाचे पाणी नदीकडे जाण्यासाठी जागा नाही. त्यामुळे पाणी महामार्गावर येत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दर्जेदार नसल्याच्या तक्रारी होत आहेत. ज्या ठिकाणी महामार्गाचे काम झाले आहे तेथील सिमेंटच्या रस्त्याला तडे जाणे , रस्ता खचणे असे प्रकार घडत आहेत. मातीचा भराव टाकत असताना पाणी मारुन योग्य रोलिंग होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुरुवातीच्याच पावसात रस्ता खचल्याने हा पावसाळ्यात महामार्गाची स्थिती काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. योग्यवेळी उपाययोजना केल्या नाहीत तर रस्ता आणखी खचण्याची भिती व्यक्त होत आहे.































































