राज्यातील शाळांचा ऑनलाइन श्रीगणेशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळातील दुसऱया शैक्षणिक वर्षाचा आज ऑनलाइन श्रीगणेशा झाला. प्रत्यक्षात शाळा सुरू न झाल्याने नवेकोरे दप्तर, खाऊचा डबा, बाकावरचा मित्रमैत्रिणींचा सहवास मिस करीत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रार्थना करीत अभ्यासाला सुरुवात केली.

शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करताना राज्यात ऑनलाइन शिक्षणासाठी ‘सह्याद्री’ वाहिनीवर पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या तासिकांचे प्रक्षेपण, धडे देण्यात आले तर सोबत ‘ज्ञानगंगा’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘जिओ’ या वाहिनीवर नव्याने तिसरी ते बारावीपर्यंतचा इयत्तानिहाय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला. ‘अभ्यासमाला’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत घरी राहूनच शिक्षण घेता यावे यासाठी ‘अभ्यासमाला’ला सुरुवात करण्यात आली. तसेच अध्ययनासाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांसाठी ब्रिज कोर्सची निर्मिती करण्यात आली असून दीक्षा अॅप आणि ई- साहित्यही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

मोबाईल, टीव्ही नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचितच

मोबाईल, टीव्ही आदी साधने नसल्याने राज्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील लाखो गोरगरीब मुलांची शाळा मात्र सुरू होऊ शकली नाही. अशा विद्यार्थ्यांना मोबाईल, टॅब उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

  • राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ebalbharati.in वर मोफत पाठय़पुस्तके
  • पहिली ते दहावीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिका तसेच व्हॉट्सअॅपवरून मराठी, गणित, विज्ञान विषयाचे प्रश्न देणार.