चोरट्यांसोबत हातमिळविणी सराफांना पडणार महागात, चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाविरूद्ध मकोका कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

नवनाथ शिंदे |  पुणे

पुण्यात सोनसाखळी हिसकाविणाऱ्य़ा सराईत टोळीविरुद्ध  नुकतीच मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच चोरीचे सोने विकत घेणाऱ्य़ा सराफालाही मकोका कारवाईत गोवण्यात आल्यामुळे व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे चोरट्यांसोबत हातमिळविणी  करून कमी किंमतीत सोने खरेदी सराफ व्यावसायिकांना भोवणार आहे. चोरीचे सोने विकत घेणाऱ्य़ा सराफाविरूद्ध मकोकानुसार कारवाई करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे काळा-बाजार करणाऱ्य़ा काही सराफी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्य़ा महिलांसह मुलींना लक्ष्य करून त्यांचा पाठलाग करीत चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकाविणाऱ्य़ा घटनांमध्ये काही महिन्यांपुर्वी वाढ झाली होती. दरदिवशी 4 ते 5 महिलांचे दागिने दिवसाढवळ्या लांबविले जात होते. त्यापार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने प्लॅन तयार करून कारवाईस सुरूवात केली. त्यानुसार शहरातील चेन स्नॅचिंगचे हॉटस्पॉट, गर्दीचे आणि वर्दीळीच्या ठिकाणांवर बारीक लक्ष ठेउन संशयितासह रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील माहितीनुसार डेटा तयार करण्यात आला. त्यानुसार  हडपसर परिसरात सोनसाखळी हिसकाविणाऱ्य़ा पहिल्या टोळीला पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याविरूद्ध थेट मकोकानुसार कारवाई करण्यात आली. त्यामुळे सोन साखळी चोरांच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यातच काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या युनीट पाचने सराईत माळी टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

शहरातील तब्बल 20 ठिकाणांहून सोनसाखळी चोरणाऱ्य़ा सराईत दीपक माळी आणि मुकेश सुनील साळुंखे यांच्याविरूद्ध मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय चोरीचे दागिने विकत घेणाऱ्य़ा सराफ सम्राट हुकूमसिंग भाटी  यांच्याविरुद्ध  ‘मकोका’नुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे काळा बाजार करणाऱ्य़ा सराफी व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांकडून टोळी तयार करून ठिकठिकाणी सोनसाखळी चोरी  केल्यानंतर काही  सराफांना हाताशी धरले जात आहे. कमी किंमतीत जास्त सोने मिळत असल्यामुळे सराफांकडूनही सोनसाखळी चोरट्यांसोबत दोस्ताना केला जात आहे. मात्र, आता चोरीचे सोने विकत घेणाऱ्य़ा सराफाची माहिती मिळाल्यास थेट मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सराफांनी अशाप्रकारे काळेधंदे केल्यास मकोकानुसार कारवाई होईल असा सूचक इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार गुंडगिरी, भाईगिरी मोडून काढणे, सराईत टोळ्याविरूद्ध मकोकानुसार कारवाई केली जात आहे. विशेषतः सोनसाखळी चोरट्यांविरूद्ध केलेल्या कारवाईमुळे चेनस्नॅचिंगचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. चोरट्यांसोबत हातमिळवणी करून काही सराफांकडून चोरीचे सोने विकत घेतले जात आहे. संबंधिताविरूद्ध  कारवाईवर भर देण्यात आला आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर