
उपनगरीय लोकलच्या रोजच्या दगदगीच्या प्रवासात होणाऱया अपघातात 14 ते 45 अशा कमावत्या वयातील व्यक्तींचेच सर्वाधिक मृत्यू होतात. तसेच सरासरी 38 मिनिटे अशा जखमींना दवाखान्यात दाखल करण्यास लागत असल्याचे मुंबईत डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासातून उघड झाले आहे.
लोकल पकडताना तोल गेल्याने किंवा गर्दीमुळे दरवाजातून पडून तसेच रूळ ओलांडताना दररोज मुंबईत सरासरी आठ ते दहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. याबाबत मुंबईतील डॉक्टरांनी एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार या अभ्यासकाळात एकूण 81 जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यातील 37 जण (46 टक्के) गंभीर जखमी झाले होते. जखमी व्यक्ती बहुतेक पुरुष (85 टक्के) होत्या आणि त्यात 14 ते 45 (91 टक्के) आणि 23 वय (28 टक्के) म्हणजे कमावत्या वयातील होत्या. बहुतांश अपघात सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरमध्ये (60 टक्के) झाले होते. जखमींना दवाखान्यात दाखल करण्यास सरासरी 38.1 मिनिटांचा वेळ लागला. 77 जणांना (95 टक्के अॅम्ब्युलन्समधील डॉक्टरांद्वारे दाखल करण्यात आले तर आठ जणांना (10 टक्के) स्थानकावर प्रथमोपचार देण्यात आले. दहा जखमींचा (12 टक्के) उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 71 जणांना (88 टक्के) उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला!
देशात दर 1.3 मिनिटांत एकाचा ट्रॉमा केअरमध्ये मृत्यू होतो. वांद्रे येथील भाभाचे सर्जन रुचिता भोयर, नितीन बोरले, संजय नगराल आणि केईएमचे मॉण्टी खजांची यांनी मुंबईतील सरकारी दवाखान्यात दाखल रेल्वे अपघातातील जखमींचा अभ्यास केला. तो ‘नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया-2020’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. जखमींना दवाखान्यात दाखल करण्याची यंत्रणा आणखी वेगवान करण्यात यावी आणि जखमींना पहिला प्रतिसाद देणाऱया व्यक्तीला अशा ट्रॉमा केसेसचे योग्य वैद्यकीय प्रशिक्षण असावे अशी मागणी करण्यात आली आहे.































































