
सोसायटीच्या नूतनीकरणाच्या कामाची परवानगी नसताना दुरुस्तीचे काम सुरू केले म्हणून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देत 20 हजारांची लाच मागून त्यापैकी 15 हजार लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या पी-उत्तर वॉर्डातील कनिष्ठ अवेक्षक संजय शर्मा यांच्या विरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे.
शर्मा यांच्या विरोधात तक्रार देणारे मालवणी परिसरात राहत असून ते राहत असलेल्या सोसायटीचे सदस्य आहेत. सदर सोसायटीच्या नूतनीकरणाचे काम चालू असल्याने इमारतीसमोर डेब्रिज साठल्याने पावसाचे पाणी साठले होते. त्यामुळे संजय शर्मा यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व विनापरवानगी दुरुस्तीचे काम करीत असल्याचे सांगून 45 हजार रुपयांचा दंड ठोठावतो असा इशारा दिला. दरम्यान, ही कारवाई होऊ द्यायची नसल्यास 20 हजार द्या अशी मागणी शर्मा यांनी केली. परंतु लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने अॅण्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेऊन शर्मा यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर शर्मा यांनी तडजोडीअंती 15 हजारांची लाच मागून ती रक्कम स्वीकारली. 15 हजारांपैकी 12 हजार त्यांनी त्यांच्या बँक खात्यात भरले. तर अडीच हजार शर्मा यांच्याजवळ सापडले. याप्रकरणी अॅण्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


























































