पाच जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका जाहीर; 19 जुलैला मतदान तर 20 जुलैला मतमोजणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

कोरोनाचा संसर्ग उतरणीला लागल्यावर आता राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर  या पाच जिल्हा परिषदा तसेच त्याअंतर्गत 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान, तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली. पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका तेथील कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील असेही मदान यांनी स्पष्ट केले.

पालघर स्तर तीनमध्ये

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनासंदर्भात ऑक्सिजन बेडच्या रुग्णांची संख्या आणि करोना पॉझिटिव्हिटी दरावर आधारित 1 ते 5 स्तर केले आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या पाच जिह्यांचा स्तर-1मध्ये समावेश झाला आहे. पालघर जिह्याचा अद्यापही स्तर-3 मध्ये समावेश आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांतील रिक्त पदांच्या निवडणुका वगळता अन्य पाच जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू

पाच जिल्हा परिषदांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 29 जून ते 5 जुलै 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील.4 जुलैला रविवार असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 जुलैला  होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱयाच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 9 जुलै 2021 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 12 जुलै, तर अपील असलेल्या ठिकाणी 14 जुलै 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील अशी माहिती मदान यांनी दिली.