
‘‘चार महिन्यांत ओबीसी आरक्षण देतो’’ असे म्हणणाऱया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोला लगावला. ‘‘पाच वर्षे भाजप सरकारच्या हातात ओबीसी विषय होता. मात्र तुम्ही काहीही केलं नाही. भाजप सरकारने डाटा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्र सरकारने डाटा दिला नाही आणि आता तुम्ही म्हणताय, चार महिन्यांत करतो’’ अशा शब्दांत भुजबळांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
ओबीसी आरक्षणावर पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाचं संपूर्ण श्रेय घ्यावं, पण ओबीसी आरक्षणाचा डाटा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत ही माझी विनंती आहे. आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज, उद्या, कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओबीसी आरक्षणाच्या डाटासंदर्भात भेटायला जायला तयार आहोत. मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, तुम्ही नेतृत्व करा, तुमच्या नेतृत्वात आम्ही पंतप्रधान मोदींना भेटायला येतो, पण तुम्ही आंदोलन करत आहात, मी स्वागत करतो.
अजित पवारांच्या चौकशीची मागणी करणाऱयांनी त्यांच्या सोबतच सरकार स्थापन केलं
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आला. त्यानंतर तो मंजूरही करण्यात आला. यावर छगन भुजबळ म्हणाले, भाजपच्या बैठकीत अजित पवार यांच्या चौकशीसंदर्भातला ठराव पास करण्यात आला आहे. मात्र त्याच भाजपने अजित पवार यांच्या सोबत सरकार स्थापन केलं होतं. आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत. शरद पवार यांच्या पाठीशीदेखील ईडी लावली होती. मात्र आमच्या पक्षाचे कोणतेही नुकसान झाले नाही.





























































