‘सिद्धेश्वर एक्सप्रेस’सह सोलापूर विभागातील पाच रेल्वेगाडय़ा 1 जुलैपासून धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची परिस्थिती सावरल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने काही रेल्वेगाडय़ा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ‘सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस’चाही समावेश आहे. सोलापूर विभागातील एकूण पाच रेल्वेगाडय़ा 1 जुलैपासून सुरू होणार आहेत.

कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्यता असल्याने रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशाची ऑक्सिजन व टेम्परेचर लेव्हल तपासली जाणार आहे. तर, संशयितांची कोरोना टेस्टही केली जाऊ शकते. परंतु आरक्षित तिकिटाशिवाय अन्य कोणत्याच प्रवाशाला त्या रेल्वेगाडय़ांतून प्रवास करता येणार नाही. आरक्षण कन्फर्म न झालेल्या व वेटिंगवरील प्रवाशांना प्रवास करता येणार नाही.

1 जुलैपासून सुरू होणाऱया रेल्वेत सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस, सोलापूर-हसन एक्प्रेस, मुंबई-लातूर एक्प्रेस, मुंबई-बिदर एक्प्रेस आणि शिर्डी-दादर एक्प्रेसचा समावेश आहे. कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसल्याने जनरल कोच सुरू करण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही.

लाखो कर्मचाऱयांचा पसारा सांभाळणाऱया रेल्वेला कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत टाकले. त्यातून आता मार्ग काढताना रेल्वे पूर्वपदावर येईल असे नियोजन करण्यात आल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले.

1 जुलैपासून ‘सिद्धेश्वर एक्प्रेस’ तिच्या निर्धारित वेळेत सुटणार. रेल्वेतून प्रवास करणाऱयांना टेस्ट अथवा लसीकरणाचे बंधन नाही. रेल्वे स्थानकावर संशयितांची कोरोना टेस्ट होईल. प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग होणार. आजारपणात प्रवास नकोच. आरक्षण कन्फर्म झालेल्यांनाच प्रवास करता येईल. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता 1 जुलैपासून सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस पूर्वीच्या वेळेत धावणार आहे. त्याशिवाय सोलापूर विभागातून धावणाऱया आणखी चार एक्प्रेस गाडय़ांचाही त्यात समावेश आहे.

– प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे