
पश्चिम रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकाचा लवकरच पुनर्विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या वतीने देशभरातील रेल्वे स्थानके विकसित करण्यात येत आहेत. त्यात अंधेरी स्थानकातील एकूण 4.31 एकर क्षेत्रफळाचा वापर पुनर्विकासासाठी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात यापैकी 2.1 एकर क्षेत्रफळाचा पुनर्विकास होणार असून उर्वरित जागेचा दुसऱया टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. पहिल्या भागात यासाठी 218 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अंधेरीपाठोपाठ दादर, कल्याण, ठाकुर्ली, वांद्रे, सीएसएमटी, ठाणे आणि बोरिवली स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या म्हणजे दररोज 4.2 लाख प्रवासी प्रवास करणाऱया अंधेरी स्थानकाला हायफाय बनविले जाणार आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी स्थानक परिसरातील 21,843 चौरस मीटर बिल्टअप एरियाचा डीबीएफओटी (डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अॅण्ड ट्रान्सफर) तत्त्वावर विकास केला जाईल. अंधेरी रेल्वे स्थानकाचा पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी ‘आरएफक्यू’ निविदा मागविण्यात येणार आहेत. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या मास्टर प्लॅनला फ्लोअर प्लॅनच्या अतिरिक्त मंजुरी पूर्वीच पश्चिम रेल्वेकडून 21 मे 2021 रोजी मंजुरी मिळाली आहे.
असे दिसेल अंधेरी स्थानक!
पुनर्विकसित अंधेरी स्थानकात ‘कॉनकोर्स लेव्हल एरिया’, जेथे सर्व पादचारी पूल आणि मेट्रो स्थानक रेल्वे स्टेशनला जोडलेले असेल अशी मोकळी जागा अंधेरी स्थानकाच्या पूर्वेला असणार आहे. स्थानकात गर्दी कमी करण्यासाठी प्रवेश, ड्रॉपऑफ – पिकअपसाठी वर्सोवा मार्ग रोड येथे सोय करण्यात येणार आहे. छताचा भाग वरच्यावरच एकसमान असा करून स्वामी नित्यानंद मार्ग रोडला जोडला जाणार आहे. पावसाचे पाणी आणि थेट येणारा सूर्यप्रकाश रोखण्यासाठी अंधेरी स्थानकाचे छत चर्चगेट आणि सीएसएमटी धर्तीवरील डिझाईनचे असणार आहे. हे स्थानक शंभर टक्के दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल वातावरणाचे असेल. सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षित उपकरणांनी युक्त ‘स्मार्ट स्टेशन’ म्हणून ते विकसित करण्यात येणार आहे. कॉनकोर्स लेव्हलवर प्रवाशांना विमानतळाप्रमाणे सर्व वाणिज्यिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस.के. लोहिया यांनी दिली आहे.


























































