
पुणे शहरात काही ठिकाणी चोरट्यांचा हैदोस सुरू असून बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली जात आहे. विमाननगरमध्ये गोकुळ एलिग्स सोसायटीतील एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याशिवाय दोन फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 12 ते 28 जूनदरम्यान घडली आहे. याप्रकरणी सविता कालरा (67) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विमानगरमधील गोकुळ एलिग्स सोसायटीत सविता राहायला आहेत. 12 ते 28 जूनदरम्यान त्या बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 50 हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 2 लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याशिवाय चोरट्यांनी त्याच इमारतीतील दोन फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने तपास करीत आहेत.























































