
कोरोना लस खरेदी करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यामुळे ब्राझीलने भारत बायोटेकबरोबर कोव्हॅक्सिन लस खरेदीचा 32 कोटी डॉलर्सचा करार स्थगित केला आहे. त्यावर भारत बायोटेकने घोटाळ्याचा आरोप फेटाळून लावला आहे. आपण काहीच चुकीचे केलेले नाही. करारातील सर्व अटी-शर्ती आणि नियमांचे टप्प्याटप्प्याने पूर्णपणे पालन केले आहे. ब्राझीलकडून अॅडव्हान्स रूपात एक पैसाही घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण भारत बायोटेकने बुधवारी दिले.
ब्राझील सरकारने कोव्हॅक्सिन खरेदीच्या करारात घोटाळा झाल्याचा आरोप करीत भारत बायोटेकसोबतचा व्यवहार स्थगित केला आहे. ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो यांनी तशी घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने भारत बायोटेकने आज आपली बाजू मांडली. कंपनीने ब्राझीलकडून मंजुरी घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व अटी व करारातील नियमांचे पूर्णपणे पालन केले. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने कोव्हॅक्सिन लस खरेदी प्रक्रियेत आठ महिने घालवले. कंपनीने नोव्हेंबर 2020 पासून 29 जून 2021 पर्यंत सगळे नियम पाळले आहेत. या कालावधीत ब्राझीलकडून अॅडव्हान्स रुपात एक पैसाही घेतलेला नाही तसेच कंपनीकडून ब्राझीलला कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठाही केलेला नाही, असे बायोटेकने स्पष्ट केले आहे.
नेमके प्रकरण काय?
कोव्हॅक्सिन खरेदीवरून ब्राझीलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. लस खरेदी करारात घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जैअर बोल्सनारो यांनी अधिक दराने ही लस खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे बोल्सनारो हेसुद्धा अडचणीत सापडले आहेत. याचदरम्यान तेथील सरकारने भारत बायोटेकसोबतचा करार स्थगित करून मोठा धक्का दिला आहे. ब्राझील सरकार भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीचे दोन कोटी डोस खरेदी करणार होते. ब्राझीलने या कराराची खुली चौकशी सुरू केली आहे.
























































