
राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक, ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसे जगावे याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारख्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. संतांची शिकवण आचरणात आणल्यास आपला महाराष्ट्र स्वच्छतेत आणि कोरोनामुक्तीत अक्वल राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2017-18 च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, स्वच्छते प्रमाणेच आता कोरोनामुक्त गाव स्पर्धा राज्य शासनाने सुरू केली आहे. गावे स्वच्छ झाली, तर कोरोनालाही आपल्याला हद्दपार करता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन दृढनिश्चय करून प्रयत्न केले त्याप्रमाणे जर सर्व नागरिकांनी माझे कुटुंब, माझे गाव, माझे राज्य कोरोनामुक्त करून दाखवेन असा दृढनिश्चय केला व त्याप्रमाणे कृती केली तर आपला महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.
निधी कमी पडू देणार नाही
केवळ योजना जाहीर करून त्याचा उपयोग नाही. त्याचा पाठपुरावा व त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. हे करीत असताना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे महत्त्व लक्षात घेता या खात्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पाणीपुरवठा खात्याचे व विजेत्यांचे अभिनंदन
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन 2017-18 अंतर्गत अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक या ग्रामपंचायतीस प्रथम, लोणी बु. ता. राहता, जि. नगर या ग्रामपंचायतीस द्वितीय तर कुशेवाडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग या ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अवनखेड ग्रामपंचायतीस पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपले राज्य हागणदारीमुक्त झाले ही समाधानाची बाब आहे. गाव स्वच्छ असतील तर लोकांचे आरोग्य चांगले राहणार. लोकांची मने स्वच्छ करण्याचे कामही या अभियानाने केले आहे.या योजना तशाच पुढे सुरू राहतील. स्वच्छतेच्या बाबतीत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या कामगिरीचे व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी विशेष काैतुक केले.






























































