पुष्करसिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; सतपाल महाराज, हरकसिंह यांना मंत्रीपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये 45 वर्षांच्या पुष्करसिंह धामी यांनी रविवारी राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते राज्याचे 11 वे मुख्यमंत्री बनले आहेत. धामी यांच्यासह सतपाल महाराज,हरकसिंह रावत वंशीधर, यशपाल आर्य, बिशन सिंह, सुबोध उनीयाल यांनाही राज्यपालांनी मंत्रीपदाची शपथ दिली आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी धामी यांच्या नावाची घोषणा शनिवारी दहेरादूनमध्ये झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र, धामी यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने भाजपामधील एक गट नाराज आहे, असे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळपासूनच भाजप आमदार आणि नेत्यांच्या बंद दाराआड बैठकांचे सत्र सुरू होते. दरम्यान, धामी यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने पक्षात नाराजी नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. सतपाल महाराज,धनसिंह रावत, बिशनसिंह चुफल,मदन कौशिक,गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनीयाल,रेखा आर्या, बंशीधर भगत सोहळ्यासाठी राजभवनात उपस्थित होते. धामी यांच्याआधी तिरथसिंह रावत यांना मुखमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, सहा महिन्यात त्यांना विधानसभेवर निवडून जाणे गरजेचे होते. या संवैधानिक संकटामुळे त्यांनी चार महिन्यातच राजीनामा दिल्याने धामी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली.

धामी यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी वरिष्ठ नेते सतपाल महाराज यांची भेट घेतली. नाराज नेत्यांमध्ये सतपाल महाराज यांचेही नाव असल्याने धामी यांनी त्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच धामी यांनी माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत आणि त्रिवेंद्रसिंह रावत यांचीही भेट घेतली. दरम्यान, धामी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याने भाजपमधील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, पत्रात एकजूट असल्याचे भाजप आमदारांकडून सांगण्यात आले.