‘हंडाभर चांदण्या’ जगण्याचे भान देणारे नाटक – रंगनाथ पठारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या अनुभवातून, जगण्यातील प्रश्नांतून साकारलेले नाटक हे वेगळ्या दृष्टीसह वेगळ्या क्षमता प्रकट करणारे असते. दत्ता पाटील लिखित हंडाभर चांदण्या हे नाटक जगण्याचे भान देणारे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी केले.

प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले, विविध मानाच्या पुरस्कारांनी गौरवलेले नाशिक येथील दत्ता पाटील लिखित ‘हंडाभर चांदण्या संहिता आणि लेख’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन संस्थेच्या प्रांगणात रंगनाथ पठारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी नाटकाचे तातडीने ‘गावठीकरण’ होणे गरजेचे असल्याची भूमिका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी मांडली आहे. म्हणजेच नाटक हे आपल्या भूमीतले हवे. आपले प्रश्न मांडणारे हवे. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘शारदा संगीत’ मधील प्रश्न मातीतला होता. त्यानंतर लोकसभेत ‘शारदा कायदा’ मंजूर झाला. कायद्याला नाव मिळावे, इतका प्रभाव त्या नाटकाचा होता, असे सांगून ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात पुढे जसजसा शिक्षणप्रसार, विकास होत गेला, तसतशा जुन्या परंपरा लयास जाऊ लागल्या. शिक्षणातून, त्याच्या प्रसारातून जे पुरेसे बळ यायला पाहिजे होते, ते आपल्याकडे दीर्घकाळ दिसत नाही, या अनुषंगाने नेमाडे यांचे विधान महत्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोककला परंपरेतील एकेकटे कलावंत आपल्या सादरीकरणातून तासनतास जनतेला खिळवून ठेवत. गोंधळी, शाहीर असे अनेक कलावंत आपल्या भोवताली गावोगावी होते. या सगळ्यांना आपल्या आत घेत नाटकात उतरवणे आवश्यक आहे, हे सूत्र हंडाभर चांदण्यामध्ये जाणवते. हे केवळ पाणी प्रश्नाचे नाटक नसून त्याहीपलिकडे जाते, असेही पठारे म्हणाले.

पुस्तकाचे संपादक, प्रसिद्ध समीक्षक सतीश बडवे, शब्दालयच्या सुमती लांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड यांनीही पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी प्रा. शिरीष लांडगे आणि लेखक दत्ता पाटील उपस्थित होते. शब्दालय प्रकाशनचे सुमीत लांडे यांनी स्वागत, तर मृण्मयी लांडे यांनी सूत्रसंचालन केले.

अभिवाचनातून अवतरली मावळवाडी

हे नाटक मावळवाडीतील पाणी प्रश्न हा विषय धरून जगणे उलगडत जाते. प्रकाशन सोहळ्यानंतर सचिन शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली नाटकातील कलावंतांनी अभिवाचन केले. त्यात प्राजक्त देशमुख, गीतांजली घोरपडे, नुपूर सावजी, अरूण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी, प्रफुल्ल दीक्षित, उर्वराज गायकवाड, रोहित सरोदे, चेतन बर्वे, प्रणव सपकाळे सहभागी झाले होते.