
आपण सुंदर दिसावे, असे कोणाला वाटत नाही? प्रत्येकाच्या मनात ही इच्छा असतेच. तजेलदार, तुकतुकीत चेहऱ्याकरिता तऱ्हेतऱ्हेचे उपाय त्वचेवर केले जातात, मात्र काही वेळा सुंदर दिसण्याच्या मोहापायी भलतेच घडू शकते. असा प्रकार एका महिलेच्या बाबतीत घडला आहे.
रेडिओ प्रेझेंटर असलेल्या लीला पार्सन यांनी सांगितले की, त्वचा उजळ आणि तजेलदार होण्याकरिता त्यांनी पहिल्यांदाच बनावट टॅन ड्रॉप्सचा वापर केला. या टॅन ड्रॉप्सचे काही थेंब त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावले, पण जेव्हा सकाळी उठून त्यांनी त्यांचा चेहरा आरशात पाहिला तेव्हा त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्याचा रंग नारिंगी झाला होता. मानेपेक्षा चेहऱ्याचा रंग गडद दिसत होता.
बनावट टॅन ड्रॉप्स उत्पादन वापरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर झालेल्या विपरित परिणामाबाबत त्यांनी त्यांच्या टिकटॉक अकाउंटवरून माहिती दिली. त्यांच्या फॅन्सनाही त्यांनी हे उत्पादन अजिबात न वापरण्याचे आवाहन करून त्यांना जागरूक केले. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर काय उपाय करायचे याविषयी मदत आणि सल्लाही मागितला.
सोशल मीडियावर लिला पार्सन यांनी शेअर केलेला व्हिडिओ बऱ्याच लोकांनी बघितल्यावर त्यांच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. एका युजर्सने या घटनेबाबत म्हटले आहे की, ‘जगातील प्रत्येक व्यक्तिला सुंदर दिसावे असे वाटते, पण ज्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील असे काही करू नका.’ तसेच बऱ्याच जणांनी बनावट उत्पादन वापरल्यामुळे त्यांचा रापलेल्या चेहऱ्यावर लिंबाच्या रसाचा वापर करण्याची सूचनाही त्यांना केली आहे.




























































