
>> राहुल गोखले
अवतीभवती घडणारे असंख्य घटनाप्रसंग आपल्याला प्रभावित करीत असतात. त्यामुळे त्रागा करून वैतागताही येऊ शकते किंवा त्यामधील विसंगती शोधून त्यावर विनोदाच्या अंगाने खुमासदार भाष्यही करता येते. सॅबी परेरा यांनी दुसरा पर्याय निवडला आहे. त्यासाठी त्यांनी आता दुर्मिळ झालेले पत्रलेखन हे माध्यम योजिले आहे. सदू धांदरफळे हा शहरात राहणारा आणि दादू हा ग्रामीण भागात राहणारा अशा दोन मित्रांमधील हा पत्रसंवाद आहे आणि त्यात अनेक विषयांना स्पर्श झाला आहे. प्रत्यक्षात सर्व पत्रे जरी सदूनेच लिहिली असली तरी दादूने पत्रे पाठवली आहेत असे उल्लेख सदूच्या पत्रांत असल्याने हा पत्रसंवाद दुतर्फी आहे. या पत्रांचे संकलन म्हणजे ‘टपालकी’ हे पुस्तक.
समाज माध्यमांतून होणाऱया संवादाला वेग असेल; पण पत्रामधील हृद्यता आणि ऐसपैसपणा त्याला नसतो. शिवाय हा पत्रसंवाद दोन मित्रांमध्ये असल्याने त्याला शिळोप्याच्या गप्पांचेही स्वरूप आहे आणि म्हणूनच ही पत्रे खुमासदारही झाली आहेत, पण त्या खुमारीला कारण आहे ते त्या पत्रांतून केलेले भाष्य. एरवीच्या थेट भाष्यापेक्षादेखील काहीदा उपरोध, उपहास अशा विनोदाच्या अंगांनी अधिक टोकदार आणि धारदार भाष्य करता येते त्याची साक्ष ही पत्रे देतील. अर्थात ती पत्रे वाचताना राजकीय, सामाजिक, कौटुंबिक अशा कितीतरी विषयांना या पत्रांतून स्पर्श केलेला आहे आणि ते विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचे असल्याने वाचक त्या पत्रांत रमून जातील याविषयी शंका नाही.
निवडणुका, प्रचार, लोकशाही, वाहिन्यांवरील चर्चा, गणेशोत्सव, सणवार, पाऊस, लोकलमधील गर्दी, व्यायाम, मोटिव्हेशन स्पीकिंग, आळशीपणा, परीक्षा येथपासून मैत्री, व्हॉट्सऍपवर येणारे ‘गुड मार्ंनग’ संदेश, सेल्फी, कुटुंब असे कितीतरी विषय त्यात येतात. हे करताना लेखकाची त्यातील विसंगती शोधण्याची आणि त्यावर मार्मिक आणि मिश्कील भाष्य करण्याची जी हातोटी आहे ती वाखाणण्याजोगी. यातील काही संवाद वाचले की, याची प्रचीती आपल्याला येते. उदा. आजकाल लोक काही पाहण्या-अनुभवण्यापेक्षा फोटो आणि सेल्फी काढता यावेत आणि सोशल मीडियावर डकवता यावेत म्हणून घराबाहेर पडतात’, ‘तुमच्याकडे आलाय का पाऊस? आला नसेल तर आज-उद्या नक्की येईल. आपल्या कलाने न घेणाऱयांशी सूडबुद्धीने वागायला पाऊस म्हणजे काही कुठल्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष किंवा गृहमंत्री नाही’, ‘केवळ एक अंगठा टेकवून फॉरवर्ड, शेअर किंवा रिट्विट करून देशसेवा, धर्मसेवा आणि समाजसेवा करून ऑनलाइन समाजसेवक बनण्याचा राजमार्ग मोकळा झाला आहे ही खचितच आनंदाची बाब आहे’, ‘आज जिथं पाहावं तिथं बांधून ठेवलेल्या गोष्टींचा सुळसुळाट झालाय.. बँक पेन बांधून ठेवतात, मेडिकल स्टोअरवाले कैची बांधून ठेवतात, फोटोकॉपी काढणारे स्टेप्लर बांधून ठेवतात, रेल्वेवाले शौचालयातील स्टीलचं टमरेल लोखंडी साखळीने बांधून ठेवतात…’, या उदाहरणांवरूनच ही सगळी पत्रे मुळातूनच का वाचली पाहिजेत याचा पुरावा मिळेल.
या पत्रांच्या आणखी दोन वैशिष्टय़ांचा उल्लेख अवश्य केला पाहिजे. एक म्हणजे त्यांचे मथळे आणि दुसरे म्हणजे खाली सही करताना सदूने स्वतःला लावलेली नमुनेदार विशेषणे. सोशल शेअर मार्केट या पत्राखाली सही आहे- ‘तुझा अप्पर सर्किट मित्र’ अशी. तीच रीत अन्य पत्रांना. म्हणजे ‘दिवस परीक्षेचे आहेत’ खाली असते ‘तुझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत असणारा मित्र’ किंवा ‘जिवाचं व्हेकेशन’ पत्राखाली सदू हा ‘सफरिंग मित्र’ असतो. ‘तुझा ‘चीन’चं न खाणारा देशभक्त मित्र, तुझा लेझीस्तानी मित्र’ आदी विशेषणे अशीच बहार आणतात.
राजकीय-सामाजिक व्यंग, स्वभावातील-व्यवहारातील विसंगती लेखकाने नेमकेपणाने टिपल्या आहेत. सूक्ष्म निरीक्षण आणि त्यावर भाष्य करण्यासाठी असणारी मार्मिक शैली यामुळे प्रत्येक पत्र हे वाचनीय झाले आहे. लेखकाने काही ठिकाणी स्मरणरंजन केले आहे. मात्र त्यात कुठेही रडगाणे नाही. सगळ्याच नव्यात नवलाई नाही अशा भावनेने काही ठिकाणी त्याला गदगदून आले आहे, तर काही जुने हरवलेले आहे याची खंतही आहे. मार्मिक चिमटे घेताना आणि मिश्कील भाष्याने हसविताना वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्यही या पत्रांत त्यामुळेच आहे.
टपालकी
लेखक – सॅबी परेरा
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठ – 163, मूल्य – रुपये 250/-





























































