‘त्या’ तीन डॉक्टरांना कर्ज घोटाळ्यात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतील 11 कोटींच्या कर्ज घोटाळ्यात अटकेत असलेल्या त्या तीन डॉक्टरांना नगरमधील 22 कोटी 90 लाख रुपयांच्या घोटाळ्यात आज वर्ग करण्यात आले असून, नगर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (दि. 16) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.

डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ‘नगर अर्बन’च्या पिंपरी-चिंचवड शाखेतील 11 कोटींच्या अपहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आठ आरोपींना अटक केली होती. यात वरील तीन डॉक्टरांचा समावेश होता. गुह्यात 11 कोटींपैकी सहा कोटी रुपये आशितोष लांडगे याच्या खात्यातून या तीन डॉक्टरांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले होते. या डॉक्टरांना नगर आर्थिक गुन्हे शाखेत दाखल असलेल्या 22 कोटी 90 लाख रुपयांच्या घोटाळ्यात अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.