
बनावट नोटांची तस्करी करणाऱ्याला क्राइम ब्रँचच्या युनिट-8 ने अटक केली. इरफान जिलानी शेख असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 95 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटांप्रकरणी इरफानला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाकोला येथे एकजण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती युनिट-8 ला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड, पोलीस निरीक्षक प्रदीप सावंत, तावडे, सावंत, रेहारे, महिला पोलीस शिपाई गायकवाड, सुतार यांच्या पथकाने शुक्रवारी सांताक्रुझच्या मिलन सबवेजवळ सापळा रचला. इरफानला पकडण्यासाठी पोलीस सकाळपासून फिल्डिंग लावून होते. रात्री इरफान हा नोटा देण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता इरफानच्या खिशातून पोलिसांनी 95 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. नोटा तस्करीच्या मोबदल्यात इरफानला एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम मिळणार होती. बनावट नोटांप्रकरणी इरफानला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले होते. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




























































