पारनेर तालुक्यातील 21 गावांमध्ये कडक लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या पारनेर तालुक्यातील 21 गावांमध्ये प्रभावी स्वरूपात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार तहसीलदार ज्योती देवरे यांनी 21 गावांमध्ये कडक लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच निर्बंध मोडणाऱया व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांवर कारवाई केली असून, नियम मोडणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार देवरे यांनी दिला आहे.

पारनेर तालुक्यात काही गावांमध्ये वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशान्वये निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी, सावरगाव, वाळवणे या 21 गावांत कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार देवरे यांनी दिले आहेत. या गावांमध्ये 100 टक्के कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने 22 जुलैपर्यंत तहसीलदार देवरे यांनी ही गावे प्रतिबंधात्मक झोन घोषित केली आहेत.

टाकळी ढोकेश्वर मध्यवर्ती बाजारपेठेचा 100 मीटर परिसर प्रतिबंधात्मक झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी जलसेन हे गावदेखील प्रतिबंधात्मक गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. टाकळी ढोकेश्वर येथील ओम ज्वेलर्स, जवळे येथील विठ्ठल हार्डवेअर, निघोज येथील कोहिनूर सुपर मार्केट हे दुकान सील करण्यात आले आहे. गेल्या 15 दिवसांपासून निघोज व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कितीही निर्बंध असली तरी निघोज ग्रामस्थ ऐकत नाहीत. तालुक्यातील सर्व गावे एकीकडे व निघोज गाव दुसरीकडे अशी स्थिती असून, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांची जबाबदारी मोठी आहे. नियम मोडणाऱयांची गय नाही, असा इशारा तहसीलदार देवरे यांनी दिला आहे.