
कोपर्डी येथील बलात्कार आणि खुनाच्या घटनेला मंगळवारी पाच वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने ग्रामस्थांनी ‘निर्भया’च्या स्मारकाजवळ एकत्र जमून तिला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ‘माझ्या छकुलीला न्याय मिळवून द्या,’ अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी 13 जुलै 2017 रोजी घडली होती. या घटनेला मंगळवारी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पीडितेची आई म्हणाली, ‘आज या घटनेला पाच वर्षे झाली; पण अजून आम्हाला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळालेला नाही. सरकारने लक्ष घालून हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.’
पीडितेचे वडील म्हणाले, ‘या घटनेला पाच वर्षे झाली तरीही ते नराधम जिवंत आहेत. नगर येथील सत्र न्यायालयात 16 महिन्यांमध्ये निकाल लागून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली; परंतु पुढे काही झाले नाही. पारनेर खटल्याचा निकाल लागून आरोपींना फाशीची शिक्षाही झाली. मात्र, आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत.’
…तोपर्यंत ‘निर्भया’चे नाव जगात राहील!
‘मराठा क्रांती मोर्चाचे नाव या जगामध्ये राहील तोपर्यंत कोपर्डी येथील ‘निर्भया’चे नाव राहणार असल्याचे प्रतिपादन कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोपर्डी येथे केले. कोपर्डी येथील घटनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोपर्डी ग्रामस्थांकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केली.
































































