राजकीय घमासान, भाजपच्या आठ आमदारांनी दिले राजीनामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल भाजपमध्ये पुन्हा राजकीय घमासान सुरू झाले आहे. भाजपच्या आठ आमदारांनी विधिमंडळ समित्यांचे राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. राजीनामे देणाऱ्यांमध्ये मिहिर गोस्वामी, मनोज टिग्गा व कृष्णा कल्याणी या सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीअगोदर तृणमूल काँग्रेस सोडून गेलेल्यांना आता घरवापसीचे वेध लागले आहेत. मुकुल राय यांच्यापाठोपाठ आणखी काही भाजपचे आमदार परतीच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी हे राज्यपालांना भेटण्यासाठी गेले असता त्याकडे अनेक भाजप आमदारांनी पाठ फिरवली होती. आता मिहिर गोस्वामी, मनोज टिगा, कृष्णा कल्याणी यांच्यासह आठ आमदारांनी विधिमंडळाच्या स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे नऊ जुलै रोजीच पक्षाने हा राजीनामा स्वीकारला आहे.

यासंदर्भात बोलताना भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर खापर फोडले. तृणमूल तोडफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.