दहावीचा निकाल 99.95 टक्के, कोकणात शतप्रतिशत; निकालात कन्यालाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

शुक्रवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालाने आजवरचे अनेक विक्रम मोडले आहेत. कोरोनामुळे यंदा दहावीची लेखी परीक्षा होऊ शकली नाही. नववीचा अंतिम निकाल आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर झालेल्या निकालाने विद्यार्थ्यांना छप्पर फाड के गुण मिळाले आहेत. यंदा दहावीत तब्बल 99.95 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. कोकण विभागाने सर्वाधिक निकालाचा आजवरचा स्वतःचाच विक्रम मोडला.

कोकणचा निकाल 100 टक्के लागला असून परीक्षेला बसलेले सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. विशेष म्हणजे, यंदा तब्बल 958 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले, तर 758 विद्यार्थ्यांचा निकाल विविध कारणांमुळे जाहीर होऊ शकलेला नाही. रिपीटर्स विद्यार्थ्यांनाही यंदा लॉटरी लागली असून कधी नव्हे ते रिपीटर्सचा निकालही नव्वदीपार पोहोचला आहे. कोरोनामुळे दहावीत गुणांचा पाऊस पडला असला तरी अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांच्या मेरिटला महत्त्व असणार आहे. अकरावी प्रवेशासाठी होणाऱया सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अकरावी प्रवेशप्रक्रिया पार पडेल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. सीईटी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

राज्य 99.95 टक्के

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
कोकण -100
अमरावती -99.98
पुणे -99.96
संभाजीनगर -99.96
मुंबई – 99.96
नाशिक – 99.96
लातूर – 99.96
कोल्हापूर – 99.92
नागपूर – 99.84

शुक्रवारी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला खरा, पण शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर एकाच वेळीत लाखो विद्यार्थी आल्याने ती साईटच क्रॅश झाली. नंतर पाच ते सहा तास हीच स्थिती होती. परिणामी मोबाइलवर साइट रिफ्रेश करून करून विद्यार्थी थकले. निकाल भरघोस लागल्याने नापास होण्याचे टेन्शन नव्हते, पण गुणांची धाकधूक होती.