
इस्रालयच्या पिगासस स्पायवेअरद्वारे झालेल्या हेरगिरीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे तत्कालीन महासंचालक कोणाच्या परवानगीने इस्रायलला गेले होते? त्यांनी कोणते प्रशिक्षण घेतले, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज ट्विटच्या माध्यमातून केला. या स्पायवेअरद्वारे महाराष्ट्रात ही हेरगिरी आणि फोन टॅपिंग झाले का याची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात याआधीच फडणवीस सरकारच्या काळात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे; परंतु आता पिगासस स्पायवेअर वापराच्या बातम्याही येत आहेत. त्यावेळी कोणी आयपीएस अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का? माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक कोणाच्या परवानगीने इस्रायलला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पिगाससशी यांचा संबंध आहे का? असे सवाल सावंत यांनी केले आहेत.
हे एक षड्यंत्र, या मागची क्रोनोलॉजी समजून घ्या
संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या बरोबर आधी ‘पिगासस स्पायवेअर’ संदर्भातील रिपोर्ट आला आहे. हे एक मोठे षड्यंत्र असून या मागची क्रोनोलॉजी समजून घेणे आवश्यक असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
फोन हॅकिंग माझ्या नावाशी याआधीही अनेकदा जोडण्यात आले आहे. मात्र आज मी गंभीरतेने सांगू इच्छितो की, हा तथाकथित रिपोर्ट लीक होण्याची वेळ आणि संसदेचे अधिवेशन याची क्रोनोलॉजी समजून घ्या. देशाच्या लोकशाहीला बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. त्यांचा उद्देश हिंदुस्थानचा विकास थांबविणे हा आहे, मात्र या उद्देशांना सरकार यशस्वी होऊ देणार नाही, असे शहा यांनी म्हटले आहे.






























































