
केरळात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. संपूर्ण देशातील एकूण नवीन कोरोनाग्रस्तांपैकी निम्मे रुग्ण एकटय़ा केरळमध्ये आढळत आहेत. राज्यात गुरुवारी सलग दुसऱया दिवशी 22 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. ही कोरोनाच्या तिसऱया लाटेची सुरुवात असल्याची भीती आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची धास्ती वाढली आहे. विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केरळ सरकारने 31 जुलै आणि 1 ऑगस्टला राज्यभर कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
देशात गुरुवारी 43,159 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर 640 लोकांचा मृत्यू झाला. देशातील या आकडेवारीत केरळने सर्वाधिक चिंता वाढवली आहे. येथे 22,056 नवीन कोरोनाग्रस्त आढळले. हे प्रमाण देशभरातील एकूण नव्या रुग्णांच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक आहे. तसेच राज्यात एका दिवसात 131 लोकांचा कोरोनाशी झुंज देताना मृत्यू झाला. कोरोनाच्या नव्या रुग्णांबरोबरच मृतांचा आकडा दिवसागणिक वाढू लागल्याने केंद्र सरकारही चिंतेत सापडले आहे. राज्यात सध्या जवळपास दीड लाखाहून अधिक ऑक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
केंद्राचे सहा सदस्यीय तज्ञांचे पथक रवाना
केरळातील कोरोनाच्या उद्रेकाने केंद्र सरकारही पुरते हादरून गेले आहे. केंद्राने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय तज्ञांचे पथक केरळमध्ये पाठवले आहे. हे पथक कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केरळ सरकारच्या विविध मोहिमांमध्ये सर्वतोपरी मदत करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
8 राज्यांमध्ये कडकडीत निर्बंध
देशातील आठ राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊनसारखे कडकडीत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामीळनाडू, मिझोराम, गोवा या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीचा समावेश आहे.



























































