
महाविद्यालयीन तरुणांकडून होणाऱया छेडछाडीला कंटाळून तालुक्यातील पिंपळनेर येथील नात्याने चुलत बहिणी असलेल्या दोन अल्पवयीन मुलींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात एका मुलीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर दुसरी अत्यवस्थ आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोनजणांवर ‘पोस्को’अन्वये गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. या प्रकाराने राळेगणसिद्धी, पिंपळनेर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी सिद्धेश पोपट रासकर (वय 19), विवेक नानाभाऊ काळोखे (वय 19, दोघे रा. पिंपळनेर) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन्ही मुली नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. यापैकी एक मुलगी राळेगणसिद्धी येथील माध्यमिक विद्यालयात, तर दुसरी पिंपळनेर येथील माध्यमिक विद्यालयात शिकत होती. आरोपी सिद्धेश व विवेक आपली नेहमी छेड काढतात, त्रास देतात, याची माहिती मुलींनी पालकांना दिली होती. दोन्ही मुलींच्या पालकांनी आरोपींना त्यांच्या आई-वडिलांच्या समक्ष समज दिली होती. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार करणे टाळले होते. समज देऊनही आरोपींनी मुलींना त्रास देणे सुरूच ठेवल्याने सततच्या त्रासाला कंटाळून मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
मुलींनी विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना शिरूर (पुणे) येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी अद्यापि अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे तपास करीत आहेत.





























































