
राज्यातील उच्चदाब वीजवाहिन्यांची देखभाल करणे, त्यांची वारंवार टेहळणी करण्याचे काम आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे होणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक शनिवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत कोरडी वीज केंद्राच्या परिसरात पार पडले.
वीज निर्मिती केंद्रात तयार होणारी वीज महापारेषण तब्बल 48 हजार सर्किट किलोमीटरच्या उच्चदाब वीजवाहिन्यांच्या माध्यमातून महावितरणपर्यंत पोहोचवते. वीजवहन सुरळीतपणे व्हावे म्हणून महापारेषणला वेळोवेळी उच्चदाब वीजवाहिन्यांची देखभाल करावी लागते. या वीजवाहिन्या उंचावरून डोंगरदऱ्यांतून गेलेल्या असल्याने सदर वीजवाहिनीत बिघाड झाल्यास त्याचा शोध घेण्यास बराच वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर महापारेषणने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वीजवाहिनीतील बिघाड शोधण्यासाठी त्याचा कसा वापर केला जाईल याचे प्रात्यक्षिक पार पडले. त्यामुळे कमी वेळेत बिघाडाचा कसा शोध घेतला जाईल याची माहिती ऊर्जामंत्र्यांना देण्यात आली. यावेळी महापारेषणचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
























































